Thane Murbad News Updates : रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.  मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव आहे.  मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील (Murbad News) सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात जायचं न्यायचं होतं, मात्र गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हतं. 


सरपंचांनंतर त्यांच्या जावयाचाही सर्पदंशानं मृत्यू


अखेर गावकऱ्यांनी या दोघांना डोली करत रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात न्यायला उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. बारका बाई हिलम या ओजीवले गावाच्या सरपंच होत्या. त्या शेतात काम करत असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांना शेतात सर्प दंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना झोळी करत रुग्णालयापर्यंत नेले. मात्र गावात यायला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना एक ते दीड किलोमीटरची पायपीट करीत झोळीतून त्यांना रुग्णालयात न्यावं लागलं. उपचार उशीरा मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई सुभाष वाघ यांना देखील 5 सप्टेंबर रोजी पहाटे घरात झोपलेले असताना सर्पदंश झाला. मग त्यांना देखील बारकाबाई प्रमाणेच झोळीतून पहाटे रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना ही रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्याने त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. 


 कोणतेच वाहन गावापर्यंत येत नाही


या ओजिवले गावात यायला रस्ता नाही, जो खाजगी आणि वनविभागातून जाणारा रस्ता आहे तो पावसाळ्यात पूर्ण चिखलमय झालेला असतो. त्यामुळे इथे कोणतेच वाहन गावापर्यंत येत नाही, गावात रस्ता असता तर आमच्या नातेवाईकांची जीव वाचले असते. मात्र गावकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाहीत आणि प्रशासन देखील त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय. 


 सरपंचाचाच असा मृत्यू होत असेल तर इतरांनी काय करावे?


मुरबाडपासून 27 किमी अंतरावरील धसई बाजारपेठेजवळील ओजिवले गावच्या हद्दीत दीड किमी अंतरावर कातकरवाडी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठीची दीड किमी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत रुग्ण आणि तेथील नागरिकांना जावे लागते. रस्त्या अभावी जर गावातील सरपंचाचाच असा मृत्यू होत असेल तर इतरांनी काय करावे असा सवाल आता उपस्थित होतोय.


मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावांना अजूनही रस्ते नाहीत, त्यामुळे याच्या विरोधात सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र प्रशासन त्याकडे अजूनही लक्ष देत नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाले असून त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या गावांना रस्ता करून द्यावा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.