Yakub Memon Controversy : मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीचा (Yakub Memon Grave Controversy) वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा (Kishori Pednekar) रऊफ मेमनबरोबर बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रऊफ मेमन याने याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या (Tiger Memon) नावाने धमकी दिली असल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आरोप हास्यापद असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.


व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, किशोरी पेडणेकर हे एका बैठकीत आहेत. या बैठकीत रऊफ मेमनही उपस्थित आहे. त्याशिवाय, इतर व्यक्ती, अधिकारीदेखील दिसत आहे. ही बैठक बडा कब्रस्तानच्या बैठकीतील असल्याचे म्हटले जात आहे. बडा कब्रस्तान आणि जुमा मशिदीशी संबंधित नसतानाही रऊफ त्या बैठकीत उपस्थित होता अशी माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ 2021 मधील असल्याचे म्हटले जात आहे.


भाजप आमदार  अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी देण्यात आली. त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ट्रस्टींनी अल्पसंख्याक मंत्री म्हणून नवाब मलिक यांच्याकडे तक्रार केली. मात्र,  त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी दुबईवरून आदेश आले. मात्र,  नवाब मलिक यांचे दाऊदशी असलेले संबंधांमुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मेमन कुटुंबियांशी असलेल्या संबंधांची चौकशीची मागणी भातखळकर यांनी केली आहे. 


किशोरी पेडणेकरांनी आरोप फेटाळले, भाजपला सुनावले


शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. वडाची साल  पिंपळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. महापौरपदी असताना काही ठिकाणी पाणी साचलं, वीज पुरवठा खंडित झाला अशा तक्रारी आल्यानंतर मी मंदिर, गुरुद्वारा, जैन मंदिर, मशिदींनाही भेट दिली. या दरम्यान त्यावेळी शिवसेनेत असलेले यशवंत जाधवदेखीलसोबत होते. त्यांनी तक्रार कानावर घातली होती. त्यानंतर आम्ही बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेचे अधिकारीदेखील आहेत. चर्चा करताना अनेकजण उपस्थित आहेत. 


या बैठकीत कोण उपस्थित आहेत, हे कसं माहीत असणार असा सवाल त्यांनी केला. महापौर असताना सगळ्या घटकातील लोकांना भेटावं लागते. त्या भेटीतील काही फोटो, व्हिडिओ शोधून शोधून त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मुंबईकरांना याची कल्पना असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. शिवसेनेच्या संयमी नेतृत्वाला, शिवसैनिकांना उकसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसैनिक आक्रमक व्हावे, हिंसाचार घडावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.


भाजपला टोला


भाजपची लोक ही डोक्यावर पडलेली लोक आहेत. त्यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नसल्याचा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय महिलेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले.