मुंबई : विधानसभेची निवडणूक आता संपली आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला मतांचं भरभरून दान दिलंय. पुढच्या काही दिवसांत महायुती आपल्या सरकारची स्थापना करणार आहे. दरम्यान,या निवडणुकीत विरोधकांनी धारावी भागातील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आणि या भागाचा विकास याला प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवलं होतं. आम्ही सत्तेत आल्यास अदानी यांचं कंत्राट रद्द करू, अशी घोषणाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता निवडणूक संपल्यानंतर धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. या भागातील जवळपास 25 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  


दिवसाला सरासरी 300 ते 400 झोपड्यांची गणना


मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुकीनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत धारावीतील 25 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या भागातील पाच सेक्टर आणि 34 झोनमध्ये सर्वेक्षणासाठी दररोज 50 हून अधिक पथके काम करत आहेत. या पथकांद्वारे दिवसाला सरासरी 300 ते 400 झोपड्यांची गणना करून 200 ते 250 घरांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत 25 हजाराहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आली असून 60 हजाराहून अधिक झोपड्यांची गणना करण्यात आली आहे.


25 हजाराहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण


झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू आहे. या काळात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आली. याच काळात पावसाळा आला. तरीदेखील या काळात सर्वेक्षणाचे काम चालू होते. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यापासून 25 हजाराहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तर 60 हजाराहून अधिक झोपड्यांची गणना करण्यात आलेली आहे. 


विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून रान उठवलं होतं. याच प्रकल्पावरून विरोधकांनी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. उद्योगपती अदानी यांच्या सोईसाठी, त्यांना फायदा व्हावा यासाठीच धारावी झोपडपट्टी पुनर्वसनाचे कंत्राट अदीनी उद्योगसमूहाला देण्यात आले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसने केला होता. आम्ही सत्तेत आल्यावर हे कंत्राट रद्द करून योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया राबवू, असे आश्वासनही महाविकास आघाडीने दिले होते. 


खासदार राहुल गांधी यांनी तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संगनमत असल्याचाही आरोप केला होता. या पत्रकार परिषदेतही त्यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून भाजपावर टीका केली होती. 


हेही वाचा :


बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार


धारावी प्रकल्प रद्द करणार, मोफत शिक्षण; ठाकरे गटाकडून आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात नेमकं होतं?


Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ