पनवेल : पनवेल महापालिकेत भाजपनं वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या गुंडांना तिकीटं दिल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. कळंबोली इथं शेकाप महाआघाडीतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
भाजपनं प्रभाग क्रमांक 16 मध्ये संतोष शेट्टी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टीवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे, घरात घुसून मारहाण करणे, असे गंभीर गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे भाजपनं अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन भाजपनं आपली लाचारी दाखवून दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. दिलेला शब्द फिरवण्यात मोदींचा हात कुणीच धरु शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
शिवाय त्यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवला. सरड्यालाही लाज वाटेल असे रंग शिवसेना बदलत आहे, अशी जहरी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
दरम्यान, पनवेल महापालिकेसाठी येत्या 24 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा पनवेल परिसरात होत आहेत. आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री संध्याकाळी खारघर आणि नवीन पनवेलमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांची कामोठेमध्ये एकच सभा होणार आहे.
संबंधित बातमी
मतदान पनवेलमध्ये, उमेदवार गावाकडे!
पनवेल महापालिकेच्या निम्म्या उमेदवारांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत!
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 160 कोट्यधीश उमेदवार!
पनवेल महापालिका निवडणुकीत घराणेशाही