मुंबई: जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला दिला.
शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ उडवला.
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे निवेदन वरच्या सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत द्यायला हवं होतं. त्यांनी तसं न करणं हा या सदनाचा अपमान. सभागृह नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधकांनी द्यावी, असं काल मुख्यमंत्री म्हणाले होते.
त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, "दुष्काळ पडणार नाही याची जबाबदारी सरकार घेत असेल, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याची जबाबदारी विरोधीपक्ष घ्यायला तयार आहे".
सरकार जर दुष्काळ पडणार नाही याची हमी देत असेल, तर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी आम्ही देऊ. काल झालेली गारपीट सरकारला का थांबवता आली नाही? असा सवालही धनंजय मुंडेंनी केला.
उत्पनावर अधिक 50% हमी भाव द्या आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, असं धनंजय मुंडेंनी नमूद केलं.
मुख्यमंत्री महोदय, अवकाळी पाऊस होणार नाही याची हमी द्या, दुष्काळ पडणार नाही याची हमी द्या 24 तास शेतीला पाणी देऊ याची हमी द्या. आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्री सभागृहात का येत नाही, मुख्यमंत्री महोदयांना कशाची हमी हवी आहे, असा प्रश्नांचा भडीमार धनंजय मुंडेंनी केला.
संबंधित बातमी
कर्जमाफी केल्यास आत्महत्या होणार नाही याची हमी देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सवाल