मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राज्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत.


भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे असतील.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ आणि इंडिया टुडे कॉनक्लेव 2017 ला ते उपस्थित राहणार आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. पण त्याआधी काहीतरी ठोस आश्वासन मिळावं, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज दुपारी दीडच्या सुमारास राजभवनात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं कळतं.

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटींची गरज

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्यालाही कर्जमाफी मिळेल, अशी आस लागली आहे. 4 लाख कोटींचा कर्जाचा भार वाहणाऱ्या राज्य सरकारनेही कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याची माहिती मागवली.

'एबीपी माझा'ला मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीत 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. मागचा घोळ लक्षात घेता, कर्जमाफी द्यायचीच झाली तर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करण्याची सरकारची भूमिका आहे.

संबंधित बातम्या

कर्जमाफी केल्यास आत्महत्या होणार नाही याची हमी देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सवाल

कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत घ्यावी, शिवसेना मंत्र्यांची मागणी

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटींची गरज