ठाणे : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिर आणि घंटाळी देवी मंदिर सकाळपासूनच भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. तसेच प्रति शिर्डी म्हणून ओळखले जाणारे वर्तकनगर येथील साई मंदिर देखील नियम आणि अटी घालून आजपासून खुले करण्यात आले. कोपिनेश्वर मंदिरात मनसेकडून सकाळी काकड आरती देखील करण्यात आली.


मनसेने सकाळी पाच वाजता अनेक मंदिरात काकड आरती केली. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात देखील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेते अभिजीत पानसे, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काकड आरती केली. यावेळी अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांनी मंदिरे सुरू केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. राज्यभरातील भाविकांनी राज ठाकरे यांच्याकडे उघडण्यासाठी साकडे घातले होते, सरकारने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेतला असे अविनाश जाधव यांनी सांगितले.


यंदाच्या दिवाळीत 72 हजार कोटींपेक्षा जास्त विक्री, चीनचं मोठं नुकसान


कोपिनेश्वर मंदिर ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे. आज सोमवार असल्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी गेले आठ महिने प्रतिक्षेत असणारे भाविक खऱ्या अर्थाने दर्शनाला आले होते. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने भाविकांसाठी विशिष्ट नियम अखून देण्यात आले आहेत. मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात देखील भक्तांना प्रवेश नाही. मात्र, सोमवारी मंदिर भक्तांसाठी खुले केल्याने भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले.



तर दुसरीकडे कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेले ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रती शिर्डी साई बाबा मंदिर आज पाडव्याच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे भाविकांना साईंचे दर्शन सुरू करण्यात आले. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून दर्शनाच्या रांगेत 3 फुटांचे अंतर देखील ठेवण्यात यावे यासाठी चौकानी बॉक्स करण्यात आले आहेत. तसेच साई बाबा मंदिरात आरतीसाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळ पासून या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिर सुरू झाल्याने शिर्डीला जाऊ न शकणारे भाविक इथे दर्शनाला येऊन आनंदित झाले आहेत.