मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाला भेटायचे वेध लागतात. मुंबईतल्या लालबागच्या राजावर तर गणेशभक्तांची विशेष श्रद्धा आहे. याच लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंची गर्दी रोज नतमस्तक होते. बाप्पाच्या चरणी कुणी सोनं, कुणी चांदी, कुणी पैसे अर्पण करतं. मात्र बाप्पाला भक्तांनी पत्रही लिहिली आहेत.


गर्दीमुळे लालबागच्या राजाच्या चरणावर अगदी काही सेकंद डोकं टेकवण्यासाठीची धडपड असते. आता या चारदोन सेकंदात गणपती बाप्पाला नेमकं काय काय आणि किती सांगायचं हा प्रश्न असतो. आधीच समोर लाखोंची गर्दी, त्या लाखोंच्या लाखभर मागण्या. चार हात असले तरी एकटा बाप्पा कुठे कुठे पुरा पडणार. म्हणून गणेशभक्तांनी स्पेशल आयडिया केली. बाप्पाला सविस्तरपणे आपलं म्हणणं कळावं म्हणून भक्तांनी अगदी मायन्यासकट पत्र लिहीलं.


To,
Dear, Ganpati Bappa
Lalbag, Mumbai


I am अमुक अमुक from this this city.
Please accept my humble request...


अशा मायन्याचं पत्र कुणी आपल्याला लिहितंय हे पाहून खुद्द बाप्पासुद्धा चक्रावून जातील. आपल्या भावना, इच्छा आकांक्षा थेट गणपती बाप्पाला लिखीत स्वरुपात पोहोचवण्याचा तसा हा अनोखा फंडा गणेशभक्तांनी वापरला. आता खुद्द बाप्पा तशी बुद्धीची देवता पण त्यालाही एवढ्या गर्दीचं ऐकायचं म्हणजे विसर पडला तर, म्हणून तारीख, वार, वर्षाच्या नोंदींसह एकानं अख्ख टाईमटेबलसह मागणीपत्रच बाप्पाला पाठवलंय.



परीक्षा जेआरएफची असो, 10 वीची असो नाहीतर एखाद्या अधिकारी पदाची. अगदी अभ्यासक्रमासकट बाप्पाला या परीक्षेत मला कोणत्या विषयात किती मार्क हवेत, हे सविस्तर सांगितलं आहे. आता बाप्पा येतोच वर्षभरातून एकदा त्याला भक्त तरी बिचारे काय करणार. मग, सगळी गाऱ्हाणं मांडण्यासाठी बाप्पाला लिहीलेल्या पत्रालासुद्धा पुरवण्याही जोडाव्या लागतात. एका भक्तानं तर परीक्षेत बाप्पानं पास करावं म्हणून त्याला अक्षरश: सहा पानी पत्र लिहीलं आहे. आता एवढ्या 6 पुरवण्या जोडता येतील, असं काही परिक्षेत लिहीलं तरी पास होण्यासाठी पुरेल पण, तो भारही बाप्पावरच टाकलाय.


आपला गणपतीबाप्पा सर्वव्यापी आहे. भक्ताचा प्रश्न कुठलाही असो बाप्पा तो सोडवणारच. म्हणूनच एका भक्तानं एक भन्नाट पत्र लिहीलंय. हे पत्र जर खरोखरच बाप्पानं वाचलं तर त्यालाही कुठून मला इच्छापूर्ती, विघ्नहर्ता अशी नावं मिळाली असा प्रश्न तो स्वत:ला विचारेल. देवा गणपती बाप्पा, मला बिअर बारचं लायसन्स मिळू दे, टँक्सपावती बनु दे... तरक्की होऊन दे... खूप पैसा आणि गाड्या पण मिळून दे... सुंदर पोरीशी लग्न होऊ दे आणि ती पोरगी पैसेवाली असून दे, अशी मागणी बाप्पाकडे केली आहे.



आता एवढं थोर प्लानिंग बाप्पानंही कधी केलं नसेल. पण, त्याच्या भक्तानं पाच-सहा ओळीच्या चिठ्ठीतून हा सगळा भार बाप्पावर सोपवला आहे. लालबागच्या गर्दीचं रक्षण करणाऱ्या पोलिसातल्या माणसालाही बाप्पाकडे तक्रार करावीशी वाटते. म्हणून एखाद्या कॉन्स्टेबलचं पत्र त्याला येतं. तो त्या पत्रात डोक्यावरच्या साहेबाची बदली कर नाहीतर माझी तरी कर, अशी मागणी टाकून मोकळा होतो.


कुणाचं ब्लड प्रेशर कमी करायचंय, तर कुणाची शुगर, कुणाची सांधेदुखी बरी करायचीय. तर कुणाच्या हार्टचा प्रॉब्लेम दूर करायचाय. या एवढ्या मागण्या असल्यावर बाप्पाच्या हार्टवर मात्र भलतंच प्रेशर येणार आहे.



लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी याबाबत सांगतात की, "ही अशी पत्र वाचली की आम्हाला हसू आवरत नाही. पण काही पत्र अशीही असतात की जी डोळ्यांत पाणी आणतात. ज्या काळात लोक एकमेकांना पत्र लिहिणं विसरली आहेत, तिथे लालबागच्या राजाला लोक पत्र लिहितात, आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देतात."


बाप्पा 64 कलांचा अधिपती, विद्येची देवता आहे म्हटल्यावर त्याला संस्कृतसह, मराठी, हिंदी, इंग्रजीचं तसं वावडं नाहीच. झालंच तर गुजराती, पंजाबी अगदी उर्दु भाषेतली पत्रसुद्धा सध्या बाप्पाला वाचावी लागत आहेत.
कुणाचं पत्र अगदीच दोन बोटाचं इवलसं तर कुणाचं हातभर लांबीच्या कागदाचं ते ही 6-6 पानी पत्रंही लालबागच्या राजाला आली आहेत.


या पत्रात कुणाची तळमळ, कुणाचे प्रयत्न प्रामाणिक हे बाप्पाला पुरतं ठावूक असेल. बाप्पाकडे व्हॉटस्अप नाही, तो फेसबुकवरही नाही त्यामुळे माझं अमुक-अमुक काम करशील तर मी तुला तमुक-तमुक देईन, अशा डीलचा लिखित पुरावा म्हणजे बाप्पाला लिहीलेली ही पत्र आहे. आता कुणाकुणाची पत्रं वाचून त्यातली कोणकोणती कामं पास करायची हे तो गणपती बाप्पाच ठरवेल.