Devendra Fadnavis Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election) जाहीर झाल्या आहेत. एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज निवडणूक आयोगाचे (Election commision) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसयांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.




शंखनाद! देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात पोस्ट केली आहे, ती एक व्हिडिओ पोस्ट आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा अंदाज दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. ते अपयश धुवून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाल्याचे या पोस्टवरून दिसून येते. त्यानंतर त्यांनी परत एक पोस्ट केली, ज्यात लिहिले की, लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू. भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू. या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा. विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय.




महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केली जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


महाराष्ट्रातील जनता यावेळी कोणाच्या हाती सत्तेची धुरा सोपवणार हे मतमोजणीनंतर ठरणार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या आहेत. सध्या महायुतीची सत्ता असून त्यात भाजप, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्याच वेळी, महाविकास आघाडी ही विरोधी आघाडी आहे, ज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (मशाल) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) यांचा समावेश आहे.