Devendra Fadnavis : तुम्ही लंवगी फटका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याप्रमाणे देवेद्र फडणवीस यानी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची माळ लावली होती.


प्राईम लोकेशनवरील जमीन स्वस्तात कशी घेतली?
नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणावरील तीन एकर जमीन फक्त तीस लाखात कशी घेतली? ज्या लोकांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन घेतली ते 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मलिकांनी जमीन कशी विकत घेतली. 


अन्य चार जागांमध्येही अंडरवर्ल्डचा हात –
कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील जागेशिवाय मलिकांनी अन्य चार ठिकाणीही मलिकांनी स्वस्तात जमीन खरेदी केली आहे. या जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात आहे. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. कुर्ल्यातील त्या जागेच्या मागेच पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर आणखी एक जागा 2005 मध्ये मलिकांच्या कुटुंबियांनी विकत घेतली होती. तसेच याच भागातील फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला येथेही 2005 साली जमीन घेतली. मलिकांची कंपनी सॉलिडसनं दोन अंडरवर्डच्या लोकांकडून फक्त 25 रुपये स्क्वेअर फुटानं जमीन विकत घेतली. आता मुंबईत उकीरड्याचीही जागाही इतक्या कमी किमतीत मिळत नाही. आता प्रश्न हा आहे, मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत का घेतली?


1993 बॉम्बस्फोटातील आरोपींशी मलिकांची जवळीक -
सरदार शहा अली खान हा 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होते. मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी आर. आर. पार्टी एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल.", हे सांगताना आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते. या दोन जणांसोबत मलिकांचे संबध आहेत. यांच्याकडून मलिकांनी जमीन खरेदी केली. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत.


व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते
2003 मध्ये जागेचा व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं का सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?


शरद पवारांना पुरावे देणार-
शरद पवार यांचे अंडरवर्ल्डसोबत संबध आहेत.त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन विकत घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन मलिकांनी स्वस्तात विकत घेतली. तसेच स्टॅम्प ड्युटीमध्येही घोटाळा कऱण्यात आलाय. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे शरद पवार आणि तपास यंत्रणांना देणार आहे. शरद पवार यांनाही समजू द्या, त्यांचे मंत्री काय करतात? असा हल्लाबोल फडणवीस यंनी केला.