Mumbai Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज एनसीबी (NCB) समोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे. एनसीबीनं रविवारी आर्यन खानला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृतीची सबब देत आर्यन खान चौकशीसाठी अनुपस्थित राहिला होता. तसेच प्रकृती ठिक झाल्यानंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं आर्यनच्या वकिलांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. दरम्यान, एनसीबीनं आर्यन खानची यापूर्वीही चौकशी केली आहे. परंतु, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आता एनसीबीचं SIT पथक करत आहे. त्यामुळे एसआयटी पथक या प्रकरणातील सर्व आरोपींचे पुन्हा नव्यानं जबाब नोंदवत आहे. रविवारी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची चौकशी करण्यात आली होती. 


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचीही चौकशी सुरु आहे. NCB च्या विजिलंस टीमनं कथित वसुली प्रकरणात दावा करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. ड्रग्ज पार्टीचं ज्या क्रूझवर आयोजन करण्यात आलं होतं, त्या क्रूझवर जाऊनही पथकानं पाहणी केली. NCB च्या विजिलंस पथकानं काल या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचीही तब्बल दहा तास चौकशी केली. 


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांची SIT देखील चौकशी करत असून मुंबई पोलिसांनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, पूजा ददलानीदेखील प्रकृतीही सबब देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागून घेतला आहे. 


वसुलीसाठी मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच किरण गोसावीनं स्वतःला एनसीबी अधिकारी सांगितलं : मुंबई पोलीस SIT


क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर NCB सह वैयक्तिक पंचांवर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचा तपास मुंबई पोलिसांची SIT करत आहे. काही लोकांनी NCB च्या नावाचा वापर करुन वसुली केली, असं तपासादरम्यान, SIT च्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी प्रभाकर साईलनं मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यानं याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. 


मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. अनेक खाजगी गुप्तहेरांनी आपण एनसीबीचे अधिकारी आहोत, असं भासवलं. तसेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला विश्वास दिला की, ते आर्यन खानला या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढू शकतील. 


मुंबई पोलिस याच तपासाच्या पार्श्वभूमीवर केपी गोसावी (Kiran Gosavi) विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्यासाठी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब नोंदवण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पूजाला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृतीची सबब देत पूजानं मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे. दरम्यान, पोलिसांनी पूजा ददलानीला लवकरात लवकरत आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.