मुंबई : आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात ज्या गोष्टी असतात अशा कुठल्याही गोष्टी यात नाहीत. हा अर्थसंकल्प नव्हताच तर जाहीर सभेतलं भाषण होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपली वित्तीय तूटही वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडल्याचं स्पष्ट दिसलं. शिवाय सरकारनं अवकाळीग्रस्तांना एकही नवा पैसा दिला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. सरकारला सत्तेचं वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांना विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Maharashtra Budget | शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पेट्रोल-डिझेल 1 रुपयाने महागणार

अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ओपनिंग, क्लोजिग बॅलेन्स किती असेल? किती तूट राहील? यातील कुठलीही गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलही संतुलन नाही.

फडणवीस म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीड हा 20 हजार कोटींचा प्रकल्प आहे. पण त्यासाठी केवळ 200 कोटी देण्यात आले आहेत. कोकणातील वाहून जाणारे 168 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडयाला दुष्काळ मुक्त करायची आमची योजना होती. पण त्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात केलेला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पातील 10 ठळक मुद्दे

ते म्हणाले की, यात शेतकऱ्यांच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत. कर्जमाफी जाहीर केली असली तरी, मुदत कर्जासंबंधी कुठलीही नवीन घोषणा केलेली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्यावेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता हीच घोषणा सरकारने केली आहे.

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी कुठल्याही नव्या घोषणा केलेल्या नाहीत. पायाभूत सुविधांवर आम्ही मोठया प्रमाणात खर्च केला पण या सरकारने तोंडाला पाने पुसली. हे सरकार 10 लाख तरुणांना रोजगार देणार नाही तर फक्त 11 महिन्यांचा अॅप्रेंटिस प्रशिक्षण देणार आहे. हे सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.