मुंबई : कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एबीपी माझाच्या व्हिजन पुढच्या दशकाचं या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एबीपी माझा'ने प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेती, कर्जमाफी, मुंबई-नागपूर हायवे, युती सरकार तसंच दिल्लीला जाण्यासंदर्भातील वृत्तासह अनेक विषयांवर भाष्य केलं.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक गरजेची
शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू आहे. शाश्वत शेतीसाठी पाम्याचं नियोजन आवश्यक असं सांगत गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवायला हवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीमुळे विकासकामं थांबणार नाही
कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत. त्यासाठी वेगळा प्लॅन तयार आहे. कर्जमाफीनंतरही शेती क्षेत्रातील गुंतवणुकीचा ट्रेण्ड थांबणार नाही, हे माझ्यासमोरील आव्हान आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शेतकऱ्यांसाठी कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
समृद्धी हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान नाही
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला अनेक शेतकरी विरोध करत आहेत. परंतु समृद्धी महामार्गाचं काम लवकरच सुरु होईल. या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक नुकसानभरपाई देत आहोत, हे मी दाव्याने सांगत आहे. मुंबई-नागपूर हायवेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा, संवाद करुनच जमीन अधिग्रहित करणार आहोत, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचा फायदाच होईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी
सत्तेत भागीदार असूनही वारंवार भाजपला वेठीस धरणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझा व्हिजन’मध्ये कठोर शब्दात ठणकावलं आहे. राज्यातील भाजपचं सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ काम करत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याचवेळी हा अदृश्य ‘हात’ म्हणजे ‘पंजा’ (काँग्रेसचा) नाही. अशी कोपरखळीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मारली.
‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यानी शिवसेनेला सुनावलं.
दिल्लीत जाण्याचा सध्यातरी प्लॅन नाही
व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची दारं उघडणारी ठरु शकते. अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. याचबाबत मुख्यमंत्र्यांना छेडण्यात आलं.
'अशी चर्चा कुठे सुरु असते मला माहित नाही. बहुधा ही चर्चा मला तुमच्या माध्यमातूनच समजते. पण सध्या तरी माझा दिल्लीला जाण्याचा कोणताही प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही तसा प्लॅन ऐकीवात नाही.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन
तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होणार : मुख्यमंत्री
सर्वात जास्त मनुष्यबळाचा आपला देश : मुख्यमंत्री
शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी : मुख्यमंत्री
शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन आवश्यक : मुख्यमंत्री
राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू : मुख्यमंत्री
गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवायला हवा : मुख्यमंत्री
शेतीला सेवाक्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
शेती आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
उद्योग क्षेत्रात दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक : मुख्यमंत्री
कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार, पण विकासकामं थांबणार नाही, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार : मुख्यमंत्री
कर्जमाफीनंतरही शेती क्षेत्रातील गुंतवणुकीचा ट्रेण्ड थांबणार नाही, हे माझ्यासमोरील आव्हान : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांसाठी कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार : मुख्यमंत्री
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम लवकरच सुरु होईल : मुख्यमंत्री
आजवरची सर्वाधिक भरपाई समृद्धी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल : मुख्यमंत्री
या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानभरपाई देत आहोत, हे मी दाव्याने सांगतो : मुख्यमंत्री
मुंबई-नागपूर हायवेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा, संवाद करुनच जमीन अधिग्रहित करणार : मुख्यमंत्री
मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना फायदा : मुख्यमंत्री
मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचा फायदाच : मुख्यमंत्री
सध्यातरी दिल्लीला जाणारा माझा प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही प्लॅन ऐकीवात नाही : मुख्यमंत्री
झोटिंग समितीतील शिफारसी इथे सांगितल्या तर माझ्यावर हक्कभंग येईल : मुख्यमंत्री
145चं गणित मला हे मीडियाच्या माध्यामातूनच समजलं : मुख्यमंत्री
शिवसेना आणि भाजप पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू : मुख्यमंत्री
भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होतात. पण 5 वर्ष आमचं सरकार टिकणार आहे : मुख्यमंत्री
ह्या सरकारला कुठलाही धोका नाही, कोणताही भूकंप होणार नाही : मुख्यमंत्री