मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित होम क्वॉरन्टाईन झाले आहेत. सुदैवाने त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार यांनी क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसंच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांना थोडा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ती निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार घरीच आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
असं असलं तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असंही कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने ती घरीच आराम करत आहेत.