मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून फक्त आणि फक्त वादामुळे चर्चेत येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कार्यक्रमावरून आता पुन्हा एकदा सरकार तोंडघशी पडले आहे. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्याची पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ आज एमएमआरडीएने (MMRDA) दुपारी तीन वाजता ठेवला होता. या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नेते नाराज होते. आजच्या कार्यक्रमासाठी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून वाशीपर्यंत आले. मात्र, कार्यक्रम रद्द झाल्यावर पुन्हा परत गेले आणि बैठका घेणे सुरू केले.


ह्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, महापौर, स्थानीक आमदार सर्वणकर आणि स्थानिक दोन नगरसेवक, मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव अशा फक्त 16 जणांना आमंत्रण देण्यात आले होते. पण या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्यासारख्या सत्तेतील प्रमुख नेत्यांना आमंत्रण नव्हते. तर मंत्रिमंडळातील अनेकांना या कार्यक्रमाची कल्पना देखील नव्हती. आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी सत्ता येताच सर्वात आधी इंदू मिल इथे भेट देऊन आढावा घेतला होता. या कार्यक्रमाची कल्पना अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत नव्हती. नेहमीप्रमाणे ते पुण्याला निघूम गेले होते. त्यांच्या बैठक ठरल्या होत्या. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती. कार्यक्रम कळल्यावर ते बीडहुन निघाले. स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता.


महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. ते अधिवेशन असल्यामुळे सध्या दिल्लीत आहेत. या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते. त्यांच्यात नाराजी आहे, या बातम्या आल्यानंतर आनंदराज यांना आज सकाळी MMRDA ने निमंत्रण दिले. राज्यातील विरोधी पक्षनेते तसंच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते. मात्र, कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती.


कोरोना काळात गर्दी नको म्हणून छोटेखानी कार्यक्रम आखण्यात आला होता. पण राज्यातील प्रमुख नेत्यांनीच या कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली नव्हती. काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनाही या कार्यक्रमा बाबत सूचना नव्हती. मंत्रिमंडळातील अनेकांनी आपली नाराजी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवली. अखेरीस हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळच सरकारवर आली. भाजप सरकार सत्तेत असताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले होते. भाजपने भव्य असा त्यासाठी कार्यक्रम देखील ठेवला होता. पण महाविकास आघाडी सरकार विरोधकांना नाहीतर मंत्रिमंडळातील आपल्या सदस्यांना या कार्यक्रमाला बोलवले नाही. त्यामुळे या कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची चर्चा या निमित्ताने झाली. या निमित्ताने महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षात समनव्य नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.


महत्वाच्या बातम्या : 


इंदू मिल आंबेडकर स्मारक : बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला!


इंदू मिल आंबेडकर स्मारक : बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी, अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकरांना निमंत्रण


डॉ. आंबेडकर स्मारक पायाभरणी कार्यक्रम रद्द, महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव?