मुंबई : नोटाबंदीचा फटका सर्वत्र पाहायला मिळतो आहे. मात्र सर्वात जास्त मनस्ताप रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतोय. यावर मॅजिक दिल संस्थेच्या डॉक्टरांनी जालीम उपाय शोधून काढला आहे. फक्त मिस्ड कॉल द्या आणि काही मिनटांत डॉक्टर तुमच्या दारात हजर राहतील. उधारीवर उपचार करून घ्या आणि पैसे आल्यावर चुकते करा.
नोटां अभावी रुग्णांना उपचार नाकारण्याचा घटना गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. यामुळे गोवंडीत एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी खाजगी रुग्णालयांना चेक स्वीकारण्याची सक्त ताकीद देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी तरुण डॉक्टरांच्या एका टीमनं यावर तोडगा काढण्यासाठी उदारीवर घर बसल्या उपचाराची अनोखी पहल केली आहे.
‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या!
मॅजिक दिलच्या 80 30636166 या हेल्पलाईन नंबर वर मिस्ड कॉल दिला की मुंबईच्या कुठल्या ही कोपऱ्यात दुचाकीवर स्वार डॉक्टरची टीम रुग्णांच्या घरी दाखल होईल. बीपी, शुगर, ऑक्सिजन लेव्हल पासून ईसीजी पर्यंचं टेस्टिंग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणार आहे. महत्वाचं म्हणजे पैशासाठी घाई अजिबात नाही. नोटा बंदीच्या निर्णयामुळे जेव्हा पैसे सुट्टे होतील तेव्हा चुकते करण्याची मुभा या टीमकडून दिली जातेय.
या उपक्रमातून डॉक्टरी पेशावरचा विश्वास आणि आदर पुन्हा एकदा बळकट तर होतोच पण पेशा वाईट नसून वृत्ती वाईट आहे आणि त्यावर मात कशी करावी याचं उत्तम उदाहरण या तरुण डॉक्टरांनी समोर ठेवलं हे निश्चित.