मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची 'मातोश्री'वर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
"आम्ही मोदींच्या विरोधात नाही, मात्र हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा जिल्हा बँकेत आहे. शेकाऱ्यांची अडवणूक कशासाठी? जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी उद्या पंतप्रधानांना निवेदन द्या, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना दिले.
तसंच स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
संजय राऊत
नोटा रद्द हा राजकीय विषय नसून सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात काय चाललय हे आम्ही पाहतोय. यावर शिवसेनेला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. उद्यापर्यंत थांबा निर्णय कळेल, असं राऊत म्हणाले.
या प्रश्नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल, तर त्यासाठी शिवसेनेची तयारी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत उद्धवजींची चर्चा सुरु आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
नोटाबंदीचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर हा प्रकार सध्या सुरू आहे. हा सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षाची लढाई नाही ही जनतेची लढाई आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.