मुंबई : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याच्या घटनेनं दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान दिल्ली येथील स्फोटानंतर मुंबईत ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
मुंबईत ज्या ज्या ठिकाणी इस्त्रायली बांधव राहतात तिथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कुलाबा येथील नरीमन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणत ज्यू लोकं राहतात. याच ठिकाणी 26/11 चा हल्ला देखील झाला होता. त्यानंतर या विभागात पोलीस सुरक्षा लावलेली असतेच. मात्र दिल्ली येथील स्फोटानंतर पोलीस इथे अलर्टवर आहेत. या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर पोलिसांची विशेष तुकडी दाखल झाली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर येणाऱ्या सर्व मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून धावणार्या प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. आठ पोलिसांचं एक पथक अशी सहा पथके मुंबईतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेसमध्ये जाऊन तपासणी करत आहेत.
दरम्यान या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Blast near Israeli Embassy Update: दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट
दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. भारत इस्त्रायलच्या नागरिकांची पूर्ण सुरक्षा करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.