मुंबई : अंतिम वर्ष अंतिम सत्र परिक्षेबाबात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे निर्णय जाहीर केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयाबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत. या निर्णयात बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असून आमची भिती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
पदवी अंतिम वर्षाबाबत गेले अनेक दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आज शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका केली. प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी केली, हे योग्यच आहे. पण शैक्षणिक आयुष्यात मात्र गोंधळात गोधळ वाढवला आहे. बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार? त्यांचा निर्णय सरकार घेणार नाही? हा तर पळपुटेपणा आहे. मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर निकाल ठरवू अशी, घोषणा केली होती आणि आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला आहे. विद्यापीठांना सूत्र ठरवायला अमर्याद वेळ दिली, मग तुम्ही कसला निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी विचार आहे.
राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल : शेलार
राज्यात 11 कृषी विद्यापीठांनी आपापले वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल. मग हे विद्यार्थी देशात स्पर्धेत कसे टिकणार? प्रतिज्ञापत्र द्यायची अट टाकली कसे देणार? प्रत्यक्ष? की ऑनलाइन? मग निसर्ग चक्रीवादळामुळे जिथे वीज नाही, त्यांनी काय करायचे? व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत काहीच निर्णय नाही. त्यामुळे त्याचे भवितव्य अधांतरीच ठेवण्यात आले आहे. एकुणच राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही. हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून अखेर आमची भिती खरी ठरली, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली आहे, अशा शब्दांत त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.
दरम्यान, पदवी परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार आशिष शेलार यांनी पहिल्या दिवसापासून सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला होता. प्रथम मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. तसेच तातडीने राज्यपालांची ही भेट घेतली होती.
MPSC Results | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल!