मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल कधी सुरु होणार, असा प्रश्न विचारला जातोय. लोकल बंद असल्याने नागरिकाना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करा अशी मागणी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा झाली. मुंबई लोकल वाहतुकीसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाईल, अशा काही सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे नेट सरासरी पेक्षा अधिक असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. मात्र इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल 3 चे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. 25 इतर जिल्ह्यात जिथे रुग्णदर कमी आहे, त्यासंदर्भात काही निर्णय होतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. दुकानांना जिथे 4 वाजेपर्यंत मुभा आहे तिथे आठवड्यातून 6 दिवस मुभा देऊ, रविवार बंद ठेऊ शकतो. सोबतच रेस्टॉरन्ट सुरु करता येईल का? अशा काही गोष्टी आहेत. दोन लस घेतलेल्यांना काही निर्बंध शिथील करता येऊ शकतात, याबाबत चर्चा झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत आज किंवा उद्या आढावा बैठक होणार आहे. त्यांच्या सूचनांनंतर कोणते नियम शिथील करायचे हा निर्णय घेतला जाईल.


जगात अनेक देशात तिसरी लाट सुरु आहे. लसीकरण झालं असल्यानं यामुळे मृत्यूदर कमी आहे. लसीकरण वेगाने होत आहे. अर्थचक्रही चाललं पाहिजे त्यामुळे निर्बंध शिथील होतील. राज्य तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे. तिसरी लाट येऊ नये असं वाटतंय, पण आलीच तर सरकारने मुबलक तयारी करुन ठेवली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


लसीकरण वेगाने सुरु आहे, मात्र लसींचा मुबलक साठा नसल्याने लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत आहे. याविषयी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं की, लसीकरण वाढवण्यासंदर्भात प्रयत्न करत आहोत. आमची केंद्र सरकारला विनंती ही आहे की 10-15 लाख लसीचे डोस रोज मिळावेत.