कल्याण : सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी अशी डोंबिवलीची ओळख. मात्र यात डोंबिवलीत भरगच्च लोकवस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या लॉजिंग अँड बोर्डिंगवर टाकलेल्या छाप्यात तेथील चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह 6 जणांना अटक करण्यात आली.


डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारतीत साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक याठिकाणी छापा टाकला. यावेळी चार तरूणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. या लॉजमध्ये पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली होती.


पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. या अवैध मार्गाला लागलेल्या या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.


या प्रकरणी  टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि  दोन दलालांच्या विरोधात या प्रकरणी 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.