मुंबई: राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वापराकरिता 20 लाखाच्या नव्या अलिशान कार खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या दिमतीला ही अलिशान कार असेल. महत्त्वाचं म्हणजे ही कार शासकीय खर्चाने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदिल दिला असून, यासांदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
अर्थ विभागाकडून प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत सध्या काटकसर सुरु आहे. अशा परिस्थितीत एव्हढी महागडी कार खरेदी करण्यास वित्त विभागाने नकार घंटा लावल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र विरोध डावलून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास, दबाव आणल्याची चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत, दिल्लीत परिषद घेणार असल्याचा इशारा दिला होता.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्त्या पाहता, शिवसेनेसह इतर घटक पक्षातील नाराजी वाढत चालल्याने, भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या सर्व घटक पक्षातील नेत्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होतंय.