नवी दिल्ली : डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. प्रमोद यांचा मुलगा यश याने जुहू पोलीस स्टेशनमध्येही तक्रार केल्याची माहिती आहे.

व्यवसायासंदर्भातील एका बैठकीसाठी शनिवारीच प्रमोद मोझॅम्बिकची राजधानी मापुटोला गेले होते. शनिवारी त्यांचा अखेरचा फोन आला होता आणि तेव्हापासून ते संपर्कात नसून फोन स्विच ऑफ आहे, अशी माहिती विनोद गोएंका यांनी दिली.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून मोझॅम्बिक सरकारशी समन्वय साधत चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयाने गोएंका कुटुंबीयांना दिलं आहे. फोनचं लोकेशन ट्रेस करुन प्रमोद गोएंका यांचा शोध घेतला जात आहे.