मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा विवाहसोहळा आज मुंबईत पार पडणार आहे. दाऊद या विवाह सोहळ्यात स्काईपद्वारे सहभागी होणार असल्याचं कळतं.
अलीशाह पारकर हा दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे. हसीना पारकरचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
गुप्तचर विभागाची करडी नजर
अलीशाहच्या विवाहावर मुंबई पोलिसांसह गुप्तचर विभागाची करडी नजर आहे. वरिष्ठ पत्रकार एस.बालकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नसमारंभातील पाहुण्यांवर, त्यांच्या गाड्या आणि गाड्यांच्या नंबरवर व्हिडीओग्राफीमार्फत नजर ठेवली जाणार आहे. तसंच लग्नसोहळा ऑनलाईन दाखवला जाऊ शकतो, यामुळे लाईव्ह चॅट आणि स्काईपवरही गुप्तचर यंत्रणेची नजर असेल.
पोलिसांची कडेकोट बंदोबस्त
दुसरीकडे दाऊदच्या भाच्याच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. जुहूच्या हॉटेल तुलिपमध्ये रिसेप्शन होणार आहे. या भागात पोलिसांनी काल रात्रीपासूनच बंदोबस्त वाढवला आहे. मात्र पोलिसांच्या गस्तीमुळे स्थानिकांना वावरण्यासाठी मनस्ताप होत आहे.
इक्बाल कासकर उपस्थित राहणार
दरम्यान, अलीशाहच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही दाऊदचा भाचा दानिश याचा विवाह झाला होता. या विवाह सोहळ्यामध्ये डी कंपनीतील अनेक लोकांनी हजेरी लावली होती.