मुंबई :  यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava)  शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळें दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याचा परिणाम आता थेट पोलिस प्रशासन, रेल्वे प्रशासन, एसटी महामंडळ आणि रस्ते वाहतुकीवर पाहायला  मिळणारं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे


 एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील सर्व आमदारांना आप आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी 300 एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास 4 हजार 500 गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील कोर्टाच्या निकालानंतर जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवाय गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठया संख्येने हजर राहा असे आदेश दिल्यामुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून देखील शिवाजी पार्कवर ऐतिहसिक गर्दी पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे


दसरा मेळाव्यांना मुंबईत मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मुंबई शहर, उपनगर आणि पोलीस प्रशासनावर होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाच्या रस्ते वाहतूक यासोबतच गर्दीच नियोजन यासाठी दररोज बैठका सुरु असल्याचं समोर आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य राखीव पोलिस दल, सीआरपीएफ, होमगार्ड यांची देखील मदत घेण्यात येणार आहे. जर बीकेसी येथे दहा हजारापेक्षा जास्त गाड्या आल्या आणि पाच लाख लोक आली तर याचा परिणाम पश्चिम आणि पूर्व उपनगरावर निश्चित होणार आहे. कारण बीकेसी हा मुंबईचा एक मुख्य कनेक्टर आहे. त्यामुळे उपनगराचे दोन प्रमुख मार्ग पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होणार आहे.तसेच शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यामुळे दक्षिण मुंबई मधील दादर, परळ, माहिम, माटुंगा, सायन या परिसरात वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे


तसेच बाहेरुन येणाऱ्या गाड्यांमुळे ठाणे, नवी मुंबईसह मुंबईला जोडणारे रस्ते ही ठप्प होऊ शकतात. यासाठीच आता मुंबई पोलीस आयुक्त रोज बैठका घेऊन मुंबईकरांना गैरसोय होऊ नाही यासाठी नियोजन करत आहेत. ज्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरसह ग्रामीण भागातील एसपी यांच्याशी ही बैठक करत आहेत.  पोलीस मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख रस्त्यावरील वाहतूक वळवतील तर काही रस्ते बंद ही केले जातील. 


दोन्ही मैदानांची क्षमता


शिवाजी पार्क - 28 एकरात पसरलेल्या मैदानात एक लाख कार्यकर्ते जमू शकतात. येणाऱ्यांसाठी तब्बल 10 हजार गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेची निर्मिती.


 बीकेसी मैदानावर देखील एक लाख कार्यकर्ते बसू शकतील तसेच 10 हजार गाड्यांची पार्कींगची देखील निर्मिती 


शिवाजी पार्कला येण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्ग किंवा पश्चिम द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता 


 बीकेसी मैदानाला येण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्ग तर कलानगरहून पश्चिम द्रुतगती मार्गाची व्यवस्था असल्याने या दोन्हीं मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता


 दोन्ही मैदानात येण्यासाठी कुर्ला, वांद्रे, दादर, माटुंगा ही रेल्वे स्थानके जवळ आहेत. त्यामुळे याठिकाणी देखील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी बेस्टकडून देखील अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत 


एकंदरीत दसरा मेळाव्याला प्रशासनापासून सर्व सामन्यांना अनेक अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासन कशाप्रकारे यावर मार्ग काढणार आणि दोन्ही गटाकडून सर्व सामान्यांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी कशाप्रकारे घेण्यात येणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.