Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे (EKnath Shinde) आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज एमएमआरडीएनं फेटाळला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC Ground) बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज एमएमआरडीने स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी मागितली होती तो अर्ज फेटाळण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला.
खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेच्या वतीनं आम्ही अर्ज केला होता. MMRDA नं त्यांना परवानगी दिली आहे. पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कवरील सभेसाठी आधी परवानगी मागितली आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे, ही परंपरा कधी थांबली नाही, असं सावंत म्हणाले.
शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ?
शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून सुरु होती. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरु केला होता. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली होती. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानासाठी अर्ज केला होता. यात चढाओढीत अखेर शिंदे गटानं बाजी मारली आहे.
आता शिवाजी पार्कवर सभेसाठी नेमकी कुणाला परवानगी मिळते याकडे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या