Dasara Melava : एका बाजूला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा तर दुसऱ्या बाजूला बीकेसी ग्राउंड वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामुळे राजकीय आरोपांच्या हजारो फैरी झाडल्या गेल्या, पण एकूण तुलना केल्यास त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्याचे पारडे जड झाल्याचे दिसून आले.


काल मुंबईत एकीकडे धार्मिक दसरा घरोघरी पार पडला जात होता तर दुसरीकडे राजकीय दसरा त्यापेक्षा कित्येक जास्त पटीने पार पडला. शिवाजी पार्क शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार या प्रश्नाचे उत्तर हायकोर्टात मिळाल्यानंतर शिवाजी पार्क उद्धव ठाकरे गटाने तर बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली. यावर्षीचा दसरा मेळावा अतिप्रचंड अफाट आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा व्हावा यासाठी दोन्ही गटाकडून शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले गेले. त्यामुळे दोन्ही दसरा मेळाव्याची तुलना तर करावीच लागणार.  


कुणाच्या मेळाव्याला किती उपस्थिती?
 
तुलना करायची झाल्यास सर्वात पहिला मुद्दा येतो गर्दीचा, मुंबई पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क यातील मेळाव्यासाठी 65 ते 70 हजार शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदानाची एकूण क्षमता 50 हजार इतकी आहे. मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला एक लाख 25 हजार ते तीस हजार शिवसैनिक उपस्थित होते असे मुंबई पोलिसांचे आकडेवारी सांगते. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी याच मैदानात सर्वाधिक 97 हजार नागरिक उपस्थित होते मात्र त्याहीपेक्षा जास्त गर्दी एकनाथ शिंदे यांनी जमवली असल्याचे पोलिसांचीच आकडेवारी सांगत आहे. 


सर्वाधिक गर्दी जमवल्याचा दावा जरी ठाकरे गटाकडून करण्यात येत असला तरी आणखीन एका बाबतीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली असं म्हणावं लागेल. ते म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास अज्ञात वाचत असलेले जयदेव ठाकरे यांना थेट व्यासपीठावर त्यांनी आणले, सोबतच स्मिता ठाकरे आणि आनंदी घे यांची सखी बहीण अरुणाताई यादेखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी व्यासपीठावर उपस्थित होत्या. ठाकरे घराण्यांच्या या सर्व व्यक्तींना व्यासपीठावर आल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. 


त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे मेळाव्याच्या आयोजनाचा, एकनाथ शिंदे यांनी कधी नव्हे तो दसरा मेळावा हा भव्य दिव्य करून दाखवला, कारण दीड लाखांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची बसण्याची आणि  खाण्याची सोय करून ठेवण्यात आली होती. शिवाजी पार्क येथील मेळाव्यात मात्र तशी खास सोय दिसून आली नाही. 


अशी होती सभेसाठी व्यवस्था
शिवाजी पार्क येथील मैदानात साठ बाय वीस फुटांचा स्टेज उभारण्यात आला होता, तर बीकेसी येथे 120 बाय 40 फुटांचा प्रचंड स्टेज होता.
शिवाजी पार्क येथे आत 3 तर बाहेर 4 एल ई डी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, जेणेकरून उधहव ठाकरे यांचे भाषण लांबच्या लोकांना बघता येईल, दुसरीकडे बीकेसी येथे स्टेजच्या बाजूला दोन 15 बाय 20 फुटांच्या स्क्रीन तर संपूर्ण मैदानात 15 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, तसेच वांद्रे भागात आस पास देखील चौकात अश्याच स्क्रीन लावल्या होत्या
पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये देखील एकनाथ शिंदे यांचा मेळावा लाईव्ह दाखवण्यात येत होता
याच प्रमाणे शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना तशी खास जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती, तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी ठाण्यातील महागड्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानातून खास धपाटे कचोऱ्या आणि गुलाबजामचे खाण्याचे पाकीट सर्वांना वाटण्यात आले. 


या सर्व टीकेला भाजपने मात्र शिंदे गटाची बाजू घेत चोख प्रतिउत्तर दिला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मिळाल्यावर उत्तर देणे महत्त्वाचे नसल्याचे सांगितले, तर नारायण राणे यांनी देखील एकनाथ शिंदे यांचाच मेळावा सरस असल्याचे म्हटले.


सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे भाषण. उद्धव ठाकरे यांचे भाषण हे 37 मिनिटांचे होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण करून उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढले, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवावर देखील टीका केली त्यावेळी तर झाल्याचे बघायला मिळाले. 


कालच्या मेळावा नंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांनी आमचाच मेळावा हा खरा मेळावा असून आमच्या मेळाव्यातली गर्दी हीच विचारांशी एकनिष्ठ असलेली गर्दी असं सांगितला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच या राजकीय दसरा मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेला कॅनवास हा प्रचंड मोठा होता हे देखील दिसून आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Dasara Melava : आव्वाज कोणाचा...? दोन्ही दसरा मेळाव्यांपैकी कोणत्या गटाचा आवाज सर्वाधिक?


Dasara Melava: मुंबई विद्यापीठात दारुच्या बाटल्या; दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटावर युवासेनेचा आरोप