Dasara Melava: दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात राजकीय पडसाद उमटत असताना आता बीकेसीच्या मेळाव्यानंतर (BKC Dasara Melava) युवा सेनेने (Yuva Sena) शिंदे गटावर आणखी एक आरोप केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी व्यवस्था केली होती, त्या जागेत मद्यपान करून मोठ्या प्रमाणात बाटल्या फेकल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारे कचरा आणि दारुच्या बाटल्या फेकल्यानं आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेनं केली आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


शिंदे गटाचा काल दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यात आलेल्या बसेस त्यासोबत चार चाकी गाड्यांची व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत करण्यात आली होती. मात्र याच मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचराचे साम्राज्य पसरला आहे. शिवाय पार्किंग गेट ही तुटले आहे. सोबतच विद्यापीठ परिसरात मोठ्याप्रमाणावर मद्यपान करुन काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विरोधात आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेने केलेली आहे. 


शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेल्या मुंबई विद्यापीठाची कचराकुंडी केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. विद्यापीठातील मोकळ्या जागी वाहन पार्किंगला जागा देण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने विनंती केल्यानंतर विद्यापीठाने ही जागा वापरण्यास दिली होती. 


दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने चांगलाच जोर लावला होता. राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना सभेसाठी आणण्यासाठी शिंदे गटाने एसटी बसेससह, खासगी वाहनांची व्यवस्था केली होती. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने येत असलेल्या शेकडो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळाव्यावरही दावा सांगितला होता. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूने शिवाजी पार्क मैदानावर दावा करण्यात आला होता. महापालिकेने ही परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबई हायकोर्टात शिवसेनेने धाव घेतली होती. हायकोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला. बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी लोकांना आमिषे देऊन गर्दी जमवली असल्याचा आरोप शिवसेनेने केले.