Darshan Solanki Iit Bombay: पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळावी आहे. दर्शन सोळंकी याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. एसआयटीच्या तपासात सुसाईड नोट मिळाल्याने विद्यार्थी संघटना करत असलेल्या जातिभेदाच्या आरोपाला अधिक पुष्टी मिळालीये. दर्शन सोळंकीला आपल्या रूममेट्सकडूनच धमकी आणि जातीवरुन हिणवलं जात असल्याचं समोर आल्याने आता विद्यार्थी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाय या संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने सुद्धा पुढील 15 दिवसात आयआयटीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटीला मिळालेली सुसाईड नोट हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आली आहे. सुसाईड नोट दर्शन सोळंकीने लिहिली आहे की आणखी कोणी, हे याबाबत अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी दर्शन सोळंकी यांच्या वसतिगृहामधील खोलीची तब्बल 9 तास तपासणी केली. पोलिसांनी या खोलीतील भिंतींवर काही लिहिलं गेलं आहे का, याचीही बारकाईने तपासणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांचे जबाब नोंदवले असून त्यात आत्महत्येच्या आठवडाभर आधी दर्शन सोळंकीचा त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत वाद होत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांनी दर्शन सोलंकी प्रकरणात क्राईम सिन रिक्रिएट केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एका विद्यार्थ्याचे जबाब नोंदवला आहे. ज्याने सोलंकीला 7 व्या मजल्यावरून उडी मारताना पाहिले होते. विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, त्याच वसतिगृहाच्या 8 व्या मजल्यावर त्याची खोली होती. त्यावेळी तो त्याच्या कुटुंबातील एका सदस्यासोबत फोनवर बोलत होता, त्याचवेळी त्याने 7 व्या मजल्यावर सोलंकीला उडी मारताना पाहिले. त्यानंतर त्याने घाईघाईने फोन कट केला आणि “दर्शन क्या कर रहा है” असे दोन-तीन वेळा म्हटले, पण काही सेकंदातच दर्शनने उडी घेतली.
दरम्यान, दर्शन सोलंकी हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्यााने आत्महत्या केली. यानंतर पवई पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आला होता.
इतर महत्वाची बातमी: