Dapoli Sai Resort Anil Parab : दापोलीतील साई रिसॉर्टशी (Dapoli Sai Resort scam ) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अटक केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी (Dapoli Sai Resort scam ) ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर आता अनिल परब यांना अटक करण्यात येणार असल्याचे सूचक वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर आता अनिल परब यांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अनिल परब यांच्यावतीनं याचिकेवर उद्या तातडीच्या सुनावणीसाठी मागणी केली जाणार आहे. जेणेकरून कारवाईपासून तातडीचं संरक्षण मिळवता येईल. याआधी ईडीने अनिल परब यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. तर, काही तास त्यांची चौकशी केली होती. मागील काही महिन्यांपासून साई रिसॉर्ट प्रकरणी गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सातत्याने किरीट सोमय्या यांच्याकडून सुरू आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचे भाऊ आहेत. दोन भावांमधली कोकणी भावकी सर्वश्रूत आहे. सदानंद कदम राजकारणात फार सक्रिय नाहीत. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. सदानंद कमद आणि रामदास कदम यांच्यातून विस्तव जात नाही. सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन 2020 मध्ये विकत घेतली. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा ईडीचा आरोप आहे.
अनिल परब यांनी आरोप फेटाळले
आपला या रिसॉर्टशी काहीही संबंध असून जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. रिसॉर्टशी काहीच संबंध नसल्याचे परब यांनी म्हटले आहे.