मुंबई: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साईनाथ आमचा वाघ आहे... तो लढत राहणार, आम्ही लढत राहू असं आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयावरुन दुर्लक्ष करण्यासाठी हे प्रकरण समोर आणलं असल्याचा आरोप त्यांनी केला. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी युवासेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप करत शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे आणि विनायक डावरे यांना ताब्यात घेतलं आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र  म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे नेते असून बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. 


साईनाथ दुर्गे यांच्यासोबत पोलिसांनी विनायक डावरे यांनाही ताब्यात घेतलं आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होते आणि रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती आहे. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, आज या प्रकरणामुळे कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य लपलेलं आहे, भाजपच्या एका सदस्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यावर कुणाचं लक्ष नाही, तसेच शिंदे गटाच्या एका आमदाराचे गोळीबार प्रकरणही यामुळे लपलं गेलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईला येत असून त्यावर कुठेही बातम्या येत नाहीत. महत्त्वाचे विषय दाबायचे आणि असं काहीतरी करत राहायचं हेच सुरू आहे. 


भूषण देसाईंचा शिवसेनेशी संबंध नाही


ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाईंनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भूषण देसाई यांच्या मुलाचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही, त्यांना भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धूवून निघायचं असेल तर त्यावर काहीही बोलणार नाही. 


नितेश राणे यांची प्रतिक्रिया


शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना अटक केल्यानंतर त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हे पदाधिकारी कोणाच्या आदेशावरुन काम करत आहेत, कुणी हा व्हिडीओ व्हायरल केला, कुणाच्या आयपी अॅड्रेसवरून काम करतायंत हे समोर आलं पाहिजे. या मागचे मास्टरमाईंड मागे राहतात, आणि विनाकारण काही तरुण पकडले जातात. कलानगर आणि विलेपार्लेवरुन कोण आदेश देतं याचा तपास केला पाहिजे."