ठाणे : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी काल (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.  यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा एकदा दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात काही काळ लोकल रोखून धरली.


मुंबईच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक चारवर जाणारी रेल रोको या कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती. ट्रॅकवर उतरलेल्या कार्यकर्त्यांमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणात भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत रेल रोको करण्यात आला.

यावेळी दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, रेल रोको करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रेल्वे वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

संबंधित बातम्या :

'महाराष्ट्र बंद' मागे : दिवसभरात काय काय घडलं?