मुंबई:  मुंबईतील छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने, पोलीस आणि आयोजकांची बाचाबाची झाली. या कार्यक्रमात गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांची भाषण होणार होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.


भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आहे, कार्यक्रम करता येणार नाही, असं पोलिसांनी आयोजकांना सांगितलं.



मात्र आम्ही आधीच कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, आता कार्यक्रम रद्द करु शकत नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी पोलिसांनी हुज्जत घातली.

भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.

छात्र भारतीने आज मुंबईत राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित केलं होतं. विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याला परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला.



असं असलं, तरी कार्यक्रमाच्या आयोजनावर छात्र भारती ठाम होती. कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं छात्र भारतीने म्हटलं होतं.

विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, आता भाईदास सभागृहाला पोलिस छावणीचं स्वरुप आलंय.  सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार होता. पहिल्या सत्रातच जिग्नेश आणि उमर बोलणार असल्याचं सांगितलं होतं.