ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. जय जवाननं तिथे 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नऊ थर लावल्यावर ते कोसळले. मात्र असं असलं तरी त्यांनी नऊ थरांच्या विश्वविक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. ठाण्यातीलच संस्कृती प्रतिष्ठान या शिवसेनेच्या दहीहंडीत जय जवाननं नऊ थर लावले.
मुंबई उपनगरात घाटकोपरच्या भटवाडी विभागात लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सालाबादप्रमाणे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक पथकांनी सलामी देण्यासाठी हजेरी लावली आहे.
वरळीच्या बावन चाळ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रगती क्रीडा मंडळाचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकाणी मानव साखळी करून ढोल ताशात हे गोविंदा पथक बजरंगबलीची गदा घेऊन दहीहंडी फोडयाला नाचत निघाले. 47 वर्ष जुन्या या गोविंद पथकाचा पारंपरिक उत्साह पाहण्याजोगा होता.
दादर प्लाजा कॉर्नर जवळ सुद्धा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकानी महाराष्ट्रातलं पाहिलं गोविंद पथक यामध्ये अंध- दिव्यांग गोविंदा हंडी फोडायला सज्ज झाले होते. 2 ते 3 महिने मेहनत करून हे अंध गोविंदा आता आजच्या दिवसासाठी सज्ज झाले.
भांडुपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधात पुकारलेल्या आंदोलनला दहीहंडी उत्सवात सुद्धा प्रचार केला गेला. भांडुपमध्ये 'मतदानात ईव्हीएम नको, बॅलेट पेपरचा हवा' अशा प्रकारचा संदेश असणारे 5 हजार टी शर्ट विविध गोविंदा पथकांना वाटप केले.
मुंबईचा सर्वात जुनं गोविंदा माझगाव ताडवाडी गोविंदा पथक याला यावर्षी 74 वर्ष पूर्ण झाले. दादर, शिवडी, लालबाग करत आता हे गोविंद पथक ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. जवळपास 800 ते 1000 गोविंदा एकत्र येऊन दोन महिन्याच्या तयारी नंतर आठ थरांची सलामी दिली.