अल्पवयीन बालगोविंदांच्या पालकांवरही कारवाई, पोलिसांचं पाऊल
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2018 07:57 AM (IST)
कोणत्याही गोविंदा पथकाच्या थरांवर बालगोविंदा आढळल्यास त्या पथकासोबतच संबंधित मुलांच्या पालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 14 वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात आली होती. याच पर्श्वभूमीवर यंदा पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मुंबईत, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. कोणत्याही गोविंदा पथकाच्या थरांवर बालगोविंदा आढळल्यास त्या पथकासोबतच संबंधित मुलांच्या पालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 सालापासून दहीहंडीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर दोन-तीन वर्षे हंडीची उंची व गोविंदांच्या वयोमर्यादेवरील अटींविषयी संभ्रमाची स्थिती होती. मात्र गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने नव्याने आदेश देऊन याबद्दलचे चित्र स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार, हंडीच्या उंचीवरील निर्बंध हटवण्यात आल्याने गोविंदा पथके कितीही थर लावू शकतात, हे स्पष्ट झाले. मात्र,14 वर्षांखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे गोविंदा पथके व आयोजकांना परवानगी देण्यापूर्वी अन्य अटींसह 14 वर्षांखालील मुला-मुलींना थर लावण्यास बंदी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.