Dahi Handi 2022 : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी (Worli) मतदारसंघात भाजपने (BJP) दहीहंडीचं (Dahi Handi 2022) आयोजन केलं आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधण्याची वेळ आली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गोविंदा असो किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रयत्न केले तरी वरळी शिवसेनेपासून तुटणार नाही," असं सुनील शिंदे म्हणाले. तसंच सध्या भाजपचे सुरु असलेले दहीहंडी आयोजनाचे प्रयत्न बालिश असल्याचं त्यांनी म्हटलं.


शिवसेनेचे आमदार, नगरसेवक असतानाही भाजपची बाजी
आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच (19 ऑगस्ट) वरळीच्या जांबोरी मैदानात हा दहीहंडी सोहळा होणार आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवक असतानाही दहीहंडी सोहळ्याच्या आयोजनात भाजपने बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दहीहंडी उत्सवासाठी शिवसेनेकडून पर्यायी मैदान शोधलं जात आहे.


Dahi Handi : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर आशिष शेलारांचं लक्ष्य, वरळीत भाजपकडून दहीहंडीचं आयोजन


...तर जांबोरी मैदानाची दुर्दशा होईल : सुनील शिंदे
यावर आमदार सुनील शिंदे म्हणाले की, "वरळीत मी स्वत: दहीहंडीचं आयोजन करत होतो. वरळीतीली जांबोरी मैदान दोन-अडीच कोटी रुपये खर्च करुन नव्याने तयार करण्यात आलं आहे. आता जांबोरी मैदानात पुन्हा दहीहंडी आयोजित केली तर या मैदानाची दुर्दशा होईल.


आदित्य ठाकरेंचा राज्यभरातील शिवसैनिकांसोबत संवाद
शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट वेगळा झाला. पक्षातील तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांच्यासमोर पक्ष वाचवण्याचं आणि पक्षबांधणीचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करुन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. 


आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाकडे मोर्चा
तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली. त्या दृष्टीने आशिष शेलार तयारी लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून की काय त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे वळवला आहे. आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करुन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा इरादा आहे.