मुंबई: प्रचारसभेच्या मैदानावरुन आता शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष आमने-सामने आले आहेत. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेनं दादरमधलं दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मात्र शिवसेनेने हे मैदान दोन-चार दिवसात नव्हे तर खूप आधीच बूक केलं आहे. त्यामुळे कधीही झोपेतून उठून मैदान मागणाऱ्यांना का देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी घेतली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या संध्याकाळी बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे. असं असताना त्याचवेळी शिवसेनेला दुसऱ्या मैदानाची गरज का आहे? असा सवाल मनसेनं विचारला आहे.
मात्र दत्ता राऊळ मैदानावर शिवसेनेचे इतर नेते सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच आरक्षित केल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.
दरम्यान या प्रकरणी मनसे निवडणूक आयोगात धाव घेण्याची शक्यता असून, मैदान मिळाले नाही, तर प्रभादेवीतल्या सामना वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर रस्त्यावर सभा आयोजित करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.
दादर-माहिम या भागामध्ये मनसेचे सध्या 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे इथे होणारी सभा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
शिवाजी पार्कवर राजकीय सभांना बंदी असल्यानं मनसेला दत्ता राऊळ मैदान मिळणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.