मुंबई : कबुतरावरुन समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण एवढं ढवळून निघेल असं कोणी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास बसला नसता. पण निवडणुकीचा हंगाम असला की अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. शांतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाचे मुनी (Jain Muni Nilesh Chandra) पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना मनसे तेवढंच तिखट उत्तर देत आहे. फक्त आपापल्या धर्मापुरता विचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का? असा प्रश्न आता पडतोय.
प्रत्येक बिल्डींगमध्ये जाऊन प्राणीमात्रांसाठी जनजागृती करणार, आप बटोंगे तो पिटोगें, भाषेवरून मारहाण किती योग्य? आम्ही जैन सनातनी आहोत, प्रत्येक वॉर्डात कबुतर रक्षक तयार करणार.... जैन मुनी निलेशचंद्र यांची ही वक्तव्यं. हे राजकीय नेते नाहीत तर हे जैन समाजातील साधू आहे. मात्र आता त्यांच्या तोंडी आंदोलनाची, राजकारणाची भाषा रुळू लागल्याचं दिसतंय. कबुतरखान्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय होऊ लागला आहे. मराठी भाषेचा सन्मान, धर्माची निष्ठा अशा गोष्टी आता निलेशचंद्र महाराज बोलू लागले आहेत.
Jain Muni Nilesh Chandra : कट्टर सनातनी असल्याचा जैनमुनींचा दावा
तुमच्यापेक्षा महाराष्ट्राचा जास्त सन्मान हा राजस्थानी समाज करतो. तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर मग भेंडी बाजारात जा. मी कट्टर सनातनी आहे, मला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे असं जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले. आता मुंबईतल्या प्रत्येक टॉवरमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. कबुतरांमुळे कोणतेही आजार होत नाहीत असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
आजपासून मी प्रत्येक टॉवर मध्ये जाणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत तसे कबूतर रक्षक तयार करत आहोत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते कबुतर घेऊन येत असतात असं ते म्हणाले.
कबुतरांचा प्रश्न धर्माशी जोडण्याच्या नादात जैनमुनीना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रश्न राज ठाकरे सोडवू शकतात असा विश्वास त्यांनी एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर बोलून दाखवला होता.
Dadar Kabutarkhana News : समाजात वाद लावण्यासाठी राजकारण
जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांच्या या वक्तव्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर तोतया मुनी वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आता पालिकेच्या तोंडावर जाणिवपूर्वक मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटवण्यासाठी हा तोतया मुनी वक्तव्य करतोय. जैन समाज-मराठी माणूस गुण्यागोविंदाने राहतात हे भाजपला पचत नाही म्हणून समाजात वाद निर्माण लावण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत. निलेशचंद्र हे मुनी आहेत. राजकीय वाटचाल करायची असेल तर त्यांनी भाजपाकडून गळ्यात गमच्छा घालून उतरावं, राजकीय भाष्य धार्मिक गुरूच्या गादीवर बसून करू नये असं अखिल चित्रे म्हणाले.
जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी आता कबुतरांसाठी थेट आंदोलनाची हाक दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवला जातोय का असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. मुंबईकरांचे, मग ते जैन असो की हिंदू, हिंदी असो की मराठी... रोजच्या जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत. कबुतरं, कबुतरखाने यावरून वाद पेटवून खरंच समाजाचं भलं होणार आहे का याचा विचार जैनमुनींसह सर्वांनीच करण्याची गरज आहे.
ही बातमी वाचा: