Mumbai Crime : मुंबईतील सायनमधील प्रसिद्ध हॉटेलमधून समोसे (Samosa) ऑर्डर करणं एका डॉक्टरला (Doctor) चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित डॉक्टर सायबर फ्रॉडचा (Cyber Fraud) बळी ठरला. समोसे ऑर्डर करताना डॉक्टरची तब्बल 1 लाख 40 हजार पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी डॉक्टरच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


फसवणूक झालेला डॉक्टर हा मुंबईतील केईएम रुग्णालयात सर्जन आहे. 8 जुलै रोजी या 27 वर्षीय डॉक्टरने सहकाऱ्यांसोबत कर्जतला पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला होता. पिकनिकसाठी स्नॅक म्हणून त्याने सायन (Sion) इथल्या गुरुकृपा नावाच्या हॉटेलमधून समोसे ऑर्डर करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने गुगलवर गुरुकृपा हॉटेल सर्च केलं आणि तिथे त्याला एक नंबर मिळाला. या नंबरवर कॉल करुन त्याने 25 प्लेट समोसे ऑर्डर केले. 


आधी 28 हजार 807 रुपये डेबिट झाले...


तुम्हाला 1500 रुपये अॅडव्हान्स पे करावे लागतील असं समोरुन सांगण्यात आलं आणि डॉक्टरने ते पैसे ट्रान्सफर केले. काही मिनिटात डॉक्टरला मेसेज आला की, 25 प्लेट समोसे दुकानातून दुपारी 1 वाजता पिक करा. त्यानंतर आणखी एक मेसेज आला ज्यात लिहिलं होतं की, सर ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स देतो, कृपया प्रतीक्षा करा... आणि त्यानंतर डिटेल्स देण्यास आले. हॉटेलमधून बोलत असल्याचं सांगणाऱ्या आरोपीने डॉक्टरकडून पेमेंटचे स्क्रीनशॉट मागवले. डॉक्टरनेही त्याच्या सांगण्यानुसार केलं. त्यानंतर आरोपीने डॉक्टरला सांगितलं की, तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी तयार करावा लागेल, आणि त्याने गुगल पे (Google Pay) अॅपवर ट्रान्झॅक्शन टॅब ओपन करण्यास सांगितलं. यानंतर डॉक्टरला 28807 नंबर टाकायला सांगून नोट टॅबमध्ये गुरुकृपा रिटर्न अॅड करायला सांगितलं. यानंतर अॅप डॉक्टरच्या अॅक्सिस बँकला लिंक झाल्यानंतर त्यामधून 28 हजार 807 रुपये डेबिट झाले.


फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरची पोलिसात धाव 


अकाऊंटमधून 28 हजार 807 रुपय कसे कट झाले असा सवाल डॉक्टरने विचारला असता आरोपीने त्याला पैसे रिफंड होण्याचं आश्वासन दिलं. यासाठी काही स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या, ज्या डॉक्टरने फॉलो केले. यानंतर आधीप्रमाणेच प्रक्रिया केली, यावेळी अकाऊंटमधून 50 हजार रुपये, नंतर 19 हजार 991 आणि 40 हजार रुपये पाठोपाठ डेबिट झाले. नेमकं काय होतंय, पैसे डेबिट का होत आहेत, असं  विचारलं असता आरोपीने त्याला पुन्हा एकदा सर्व पैसे परत येतील, अशी हमी देत पुन्हा हीच प्रोसेस फॉलो करण्यास सांगितलं. परंतु यानंतर डॉक्टरला काहीतरी चुकीचं असल्याची शंका आली आणि त्याने फोन डिस्कनेक्ट केला. त्यानंतर त्याने गुरुकृपा हॉटेलमध्ये कॉल केला आणि संबंधित मोबाईल क्रमांक असलेला इसम हॉटेलमध्ये काम करतो का याबाबत विचारणा केली. परंतु असा कोणताही इसम इथे काम करत नसल्याचं हॉटेलमधून सांगण्यात आलं, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं समजलं.   


यानंतर डॉक्टरने भोईवाडा पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. डॉक्टरच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी अज्ञात कॉलरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा


Cyber Security : ऑनलाईन सर्च करताना सावधान! डाॅक्टरांची खोटी अपॉईंटमेंट देऊन वकिलाला 99 हजाराचा गंडा