मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सीएसएमटीएम पुलाच्या बाह्य रुपाकडं लक्ष दिलं गेलं मात्र पुलाच्या मजबुतीकडे मात्र लक्ष दिलं गेलं नाही.  2016 मध्ये दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रंगरंगोटी, नव्या फरश्या बसवणे, नवे दिवे लावणे अशी कामं हाती घेण्यात आली.



यावेळी आता कोसळलेल्या सीएसएमटी पुलालाही नव्यानं रंगरंगोटी करण्यात आली. तसंच फरश्याही नव्या बसवण्यात आल्या. या नव्या फरश्यांनीच पुलावरचा भार वाढला का आणि पूल कोसळला का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या सुशोभिकरणानंतर झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं गेलं.


दरम्यान, सीएसएमटीवरील पादचारी पूल कोसळल्यानंतर पादचाऱ्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाही. जीव धोक्यात घालून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी डिव्हाईडरवरुन उड्या माराव्या लागत आहे. सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पूल कोसळल्यानंतर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं मुश्कील झालं आहे.

सीएसएमटी स्टेशनवरुन महापालिका मार्गाकडे आणि क्रॉफर्ड मार्केटकडे भर ट्रॅफीकमध्ये सर्वसामान्य पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो आहे. पूल तुटल्याने मुंबईकरांना सीएसएमटी सबवेचा एकच पर्याय उरतो, मात्र त्यासाठी बराच लांबचा पल्ला पार करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून पादचारी डिव्हायडरवरुन उडी मारण्याला पसंती देत आहेत.


लवकरच ज्याठिकाणी पूल कोसळला तिथे एक ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येईल आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला जाईल. ट्रॅफिक सिग्नल संदर्भात सध्या घटनास्थळावर पाहणी सुरु आहे, मात्र तोपर्यंत पादचाऱ्यांच्या रस्ता ओलांडण्याच्या पद्धतीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सीएसएमटी पूल दुर्घटना

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेल्या पादचारी पुलाचा कामा रुग्णालयाजवळचा भाग गुरुवारी (14 मार्च) संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला होता. पूलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सीएसटीएम स्टेशनजवळ झालेल्या या पूल दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35), मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. तसंच दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या


पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी


मुंबई पूल दुर्घटना : मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री 


सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे 


बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका


पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप


'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे


रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली