मुंबई : मध्य रेल्वेकडून सीएसटी रेल्वे स्थानकाच्या नावात बदलाची अधिसूचना जारी झाल्यानंतर आजपासून (30 जून) अंमलबजावणी झाली आहे. यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असणारं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं झालं आहे. त्यामुळे आजपासून उद्घोषणाही नव्या नावाने ऐकायला मिळाली.


रेल्वे स्थानकाचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असलं तरी स्टेशन कोड ‘CSTM’ असंच कायम राहणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

‘छत्रपती शिवाजी’ या नावापुढे ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. मात्र, निर्णयाच्या अंमलबजावणीला वेळ लागत होता. अखेर काल अधिसूचना जारी केल्यानंतर आजपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा बदल झाला आहे.

यापूर्वी सीएसटी स्टेशनचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र, 1996 साली व्हीटी स्टेशनच्या नावात बदल करुन ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आलं होतं. या स्टेशनचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज स्थळांमध्ये समावेश आहे.

देशातील सर्वात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्टेशनची बांधणी 1887 साली झाली. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने बांधण्यात आलेलं हे रेल्वेस्थानक मुंबईतील सर्वात मोठे स्थानक आहे.