मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक करण्यात आली आहे. देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 31 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य झालं होतं का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती.

स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईचं कार्यालय नसून घरातूनच तो कामकाज करत असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली होती.
सीएसएमटी पूल दुर्घटना : मृतांच्या आप्तांना एक कोटी द्या, हायकोर्टात याचिका

 कलम 304 (2) अंतर्गत देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीचा अहवाल सादर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात महापालिकेने मुख्य अभियंता ए. आर. पाटील आणि सहाय्यक एस. एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.