मुंबई : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानसह तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शनिवारी या प्रकरणातील अन्य नऊ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाकडनं जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण 20 आरोपींपैकी 14 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Continues below advertisement


मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीकडून 2 ऑक्टोबरला छापेमोरी करण्यात आली होती. त्यावेळी बॉलिवूडचा किंगखान शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह एकूण 20 जणांना अटक करण्यात आली. यापैकी अवीन साहू आणि मनीष राजगरिया यांना मंगळवारी विशेष न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला.


त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी याचप्रकरणी आर्चित कुमारसह नऊ जणांना जामीन मंजूर केला. त्यात नुपूर सतीजा, गोमित चोप्रा यांनाही जामीन मिळाला असून त्यांच्यासोबत क्रुझवर इव्हेंट आयोजित करणाऱ्या कॅनेप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट कंपनीचे संचालक गोपालजी आनंद आणि समीर सेहगल आणि त्यांचे दोन कर्मचारी मानव सिंघल आणि भास्कर अरोरासह श्रेयर नायर आणि इश्मित चढ्ढा यांनाही आता जामीन मिळालेला आहे. या सर्वांना 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.


हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तपासात सहकार्य करावं, पुराव्यांशी छेडछाड करू नये, आणि जामीनावर असताना असा गुन्हा पुन्हा करू नये, या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीसह अन्यकाही शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.