Mumbai Corona Update : कोरोना महामारीची तीव्रता आता काहीशी कमी होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने आज दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 38 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसंच एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. दरम्यान मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या आजही आटोक्यात दिसून आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हून कमी दिसत आहे.


नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 484 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 38 रुग्णांपैकी 5 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 856 बेड्सपैकी केवळ 299 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दर 6815 दिवसांवर पोहोचला आहे. 


राज्यात 225 नवे कोरोनाबाधित


राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे.  या आठवड्यात दुसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. याआधी 2 मार्चला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 225 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 461 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 18 एप्रिल 2020 नंतरचा राज्यातील आजचा सर्वात कमी रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात आज शून्य  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 17 हजार 823  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे.   


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha