मुंबई : पीएम केअर्स फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे, असं आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलं आहे.
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या 17 मे रोजीच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकारचा गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला आहे. कंपनीचे 58 व्हेंटिलेटर तकलादू निघाल्याने इतर 37 व्हेंटिलेटर खोलण्याचे या कंपनीचे धैर्यच झाले नाही. 14 मे ोजी केंद्र सरकारने केलेली सारवासारव खोटी होती, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.
ज्योती सीएनसीचे व्हेंटिलेटर 12 एप्रिलला आले. केंद्र सरकारने 19 एप्रिल सांगितले, हे खोटं आहे. 12 एप्रिललाच जिल्हाधिकाऱ्यांना हे वापरण्यासारखे नाही असा अहवाल दिला आहे. 18 एप्रिलला ज्योती कंपनीच्या सहदेव मुचकुंद व कल्पेश या तंत्रज्ञांनी 25 धामण-3 हे व्हेंटिलेटर इन्स्टॉल केले. जे 20 तारखेपर्यंत गंभीर त्रुटींमुळे परत आले. 23 एप्रिलाला पुन्हा तंत्रज्ञांना बोलवले पण त्यांनी दुरुस्त केलेले 2 व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. त्यानंतर या तंत्रज्ञांनी तोंड दाखवलं नाही, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
पुढे सचिन सावंत यांनी म्हटलं की, 6 मे रोजी व 10 मे रोजी या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीने तसा अहवाल दिला आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने बोंबाबोंब केल्यावर 13 व 14 मे रोजी राजेश रॉय व आशुतोष गाडगीळ हे तंत्रज्ञ आले. त्यांनी दुरुस्त केलेले 2 व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. नंतर त्यांनी पळ काढला आहे. खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालयेही ती वापरत नाहीत.
तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून या केंद्र सरकारच्या 14 मे रोजी केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने केंद्राचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झाले. तसेच आमची केंद्र व राज्य सरकारने एकत्रित लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची मागणी पूर्णपणे योग्य आहे हे सिद्ध झाले, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.