भिवंडी : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या सापडल्यानंतर जेलिटीन स्फोटजकांच्या अवैध साठ्यांवर ठिकठिकाणी धाडसत्र सुरु झाली आहेत. अशात सोमवारी भिवंडीतील कारीवली गावच्या हद्दीत असलेल्या खदानीच्या बाजूच्या कार्यालयात जिलेटिनच्या अवैध साठ्यावर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणाहून तब्बल 12 हजार जिलेटीनच्या कांड्या तर तीन हजार डेटीनेटर कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. 


गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे (वय 53 रा. कालवार) असे अवैध जिलेटीन साठा साठविल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असतानाही सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे 25 किलो वजनाचे एकुण 60 बॉक्स त्यात एकुण 11,400 जिलेटिन स्फोटकं पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकूण वजन 1,500 किलो आहे. डेक्कन पॉवर कंपनीचे 3 बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये 200 जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांड्या अशा एकुण 600 जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांड्या ज्यांचे एकुण वजन 45 किलो आहे, अशा एकुण 12 हजार जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांड्या व सोलर कंपनीचे 2508 इलेक्ट्रीक डेटोनेटर व डेक्कन कंपनीचे 500 इलेक्ट्रीक डेटोनेटर असे एकुण 3008 इलेक्ट्रीक डेटोनेटर असा मोठ्या प्रमाणात जिलेटीन व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा एकुण 2 लाख 7 हजार रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थांचा साठा विना परवाना व बेकायदेशीरित्या साठविला असल्याचे आढळून आले. 


या अवैध जिलेटीन साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळली होती. त्यांनी याठिकाणी छापा टाकून अवैध जिलेटीन साठा जप्त केला आहे. हा साठा कुठन आणला, यासाठी त्यांना कोणी मदत केली तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा कशासाठी जमा करण्यात आला होता. याचे धागेदोरे कुठे जुळलेत का? याची संपूर्ण चौकशी केली जात आहे. तर खदाणीत स्फोट घडवण्यासाठी या जिलेटीन कांड्या वापरल्या जात असाव्यात असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत.