मुंबई : गणेशोत्सवानंतर किमान 10 दिवस 'वेट अँड वॉच' करणार असं स्पष्ट करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेले निर्बंध हटवण्याचा तूर्तास विचार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यानं पुढील आठवड्यांत याबाबत निर्णय घेऊ, असं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितलं. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेले सर्व अंतरिम दिलासे 8 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवले आहेत. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही हे निर्देश लागू राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर बांधकामांना हायकोर्टाकडून पुन्हा अभय देण्यात आलं आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत दिलेले कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश आता 8 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. 


Coronavirus Update : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांवर, सलग दुसऱ्या दिवशी 30 हजारांहून अधिक रुग्ण


मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठानं शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. राज्यातील परिस्थिती सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, त्यामुळे लवकरच सारं काही पूर्वपदावर येईल आणि राज्यातील सर्व न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू होतील. त्यामुळे सध्या लोकांच्या प्रवासावर निर्बंध असताना न्यायालयापर्यंत न पोहचता आल्यानं कुणावरही अन्याय होऊ नये या हेतूनचं हे दिलासे वारंवार वाढवण्यात आल्याचंही हायकोर्टानं आपल्या निर्देशांत स्पष्ट केलं. जर परिस्थिती आणखीन सुधारली तर आम्ही हे दिलासे बंद करू जेणेकरून तुम्ही या निर्देशांचा गैरफायदाही घेणार नाही असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. 


मात्र, राज्यात तिसऱ्या लाटेनं डोकं वर काढू नये यासाठी प्रशासन देत असलेल्या सूचनांचं आणि सध्या लागू असलेल्या निर्बंधांचं काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. अन्यथा परिस्थिती हाताबेहर जाईल अशी भावना व्यक्त करत गेल्या सुनावणीत हे निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले होते.


देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांवर


भारतात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 318 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 32,542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.