मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जींना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना सोमवारी सरकारी रुग्णालयातून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे पीटर मुखर्जी यांना आर्थर रोड जेलमधून जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.


छातीत कळा येत असल्यामुळे रविवारी दिवसभर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या. सोमवारी पीटर मुखर्जी यांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या वकिलांमार्फत सीबीआय विशेष न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.

जे. जे रुग्णालयातील त्यांच्या चाचण्यांचा अहवाल आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यात पीटर यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या ह्रदयाच्या धमण्यांमध्ये चार ब्लॉकेजेस झाले असून त्यासाठी त्यांची अँजिओग्राफी, अथवा बायपास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीटर मुखर्जींची प्रकृती पाहता त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरत न्यायाधीश जगदाळे यांनी पोलिसांच्या निगराणीत खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी पीटर यांना दिली. तसंच त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार देण्यात येतील, त्याबाबतची माहिती न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही पीटर यांच्या वकिलांना दिले आहेत.

पीटरवर आपली सावत्र मुलगी शीना बोराच्या हत्येत सामील असल्याचा आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. शीना बोरा हत्या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्व पती संजीव खन्ना यांनाही अटक करण्यात आली आहे.