मुंबई : मुंबईतल्या भाईंदर परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याला रेल्वेतल्या पँट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे नीरऐवजी दुसरं पाणी का दिला, असा जाब विचारणाऱ्या जोडप्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वेतल्या पँट्रीकार मधल्या जवळपास 20 कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
भाईंदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
हा प्रकार घडत असताना एका सहप्रवाशाने याचं चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केलं. यानंतर रेल्वेच्या ट्वीटर हँडलवर या प्रकाराची गुप्ता यांच्या मित्राने तक्रार दाखल केली. ज्यावर तात्काळ कारवाई करत गुजरातच्या रेल्वे पोलिसांनी पँट्रीकारच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.