कल्याण : महापालिका आवारात शिवसेना नगरसेवकानं अशोक शिंदे नावाच्या नागरिकाला मारहाण केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पालिकेच्या आवारातच ही मारहाण करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारे शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्याविरोधात नुकताच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोहन उगलेंच्या प्रभागात अशोक शिंदे यांची टपरी होती. त्यावर कारवाई करत नगरसेवक उगलेंनी ती तोडली. यानंतर अशोक शिंदे यांनी उपोषण करत उगलेंच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी केली होती. याच रागातून अशोक शिंदेंना मारहाण करण्यात आली आहे.

मारहाणीनंतर अशोक शिंदे आणि शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी एकमेकांविरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नुकताच मनसेच्या माजी नगरसेविका मिनाक्षी डोईफोडे यांनी मोहन उगलेंविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर उगलेंवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.